विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केलेल्या हनीट्रॅप आरोपावरून सभागृहाचा वेळ वाया घालवल्याबद्दल मुख्यमंत्र्यानी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ना हनी आहे, ना ट्रॅप आहे. पण वातावरण असे निर्माण होत आहे की, आजी माजी मंत्री सगळे एकमेकांकडे बघत बसले आहेत. कोण या हनीट्रॅपमध्ये फसले आहे? असाच एकमेकांना प्रश्न विचारत आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनीट्रॅपच्या चर्चा फेटाळल्या आहेत. (Neither Honey, Nor Trap: CM Slams Nana Patole)
राज्यात नाशिकमधील हनीट्रॅपचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत होते. मुंबईतील मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असूनही राज्याचे मंत्री याबाबत सभागृहात उभे राहून उत्तरही देत नाहीत, ना निवेदन करत आहेत.” असे आरोप नाना पटोले यांनी विधानसभेत केला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये हे सर्व प्रकार घडत असल्याचे सभागृहात सांगितले होते. या आरोपांवरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आणि सभागृहाचा वेळ वाया घालवला म्हणून नाना पटोले यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक दिवस सभागृहात हनीट्रॅपची चर्चा होत आहे. कोणता हनीट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. नानाभाऊंनी तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. पण नानाभाऊ आमच्याकडे कोणताही बॉम्ब आलाच नाही. जर तुमच्याकडे असेल तर आम्हाला दिला तरी पाहिजे ना.
ना हनी आहे ना ट्रॅप आहे. कोणत्याही आजी माजी मंत्र्यांच्या हनीट्रॅपची तक्रार ही नाही पुरावेही नाही. अशी कोणतीही घटना समोर आलेलीनाना भाऊ कोणतीही घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण वातावरण असे निर्माण होत आहे की, आजी माजी मंत्री सगळे एकमेकांकडे बघत बसले आहेत. कोण या हनीट्रॅपमध्ये फसले आहे? असाच एकमेकांना प्रश्न विचारत आहेत. एकच तक्रार आली होती नाशिकच्या संदर्भात आली होती. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात ती एक तक्रार होती आणि ती मागेही घेतली असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकमधील एका हॉटेलचा उल्लेख केला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सातत्याने आपण एका हॉटेलचा आणि हॉटेलमालकाचा उल्लेख केला. ती व्यक्ती कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष होता. कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली आहे.
नाना पटोले यांना सुनावताना मुख्यमंत्री म्हणाले, मी एवढेच सांगू इच्छितो की, अशाप्रकारे सभागृह सोडून जाणे, सभागृहाचा वेळ घालवणे. व्यवस्थित पुरावे आणायचे आणि जोरदार मांडायचे. सत्ताधाऱ्यांची बोलती बंद करायची असते. महाराष्ट्र आधीही सुसंकृत होता आणि आजही आहे. फक्त विष जे पेरत आहेत त्यांना थोडा लगाम लावण्याची आवश्यकता आहे.