विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत पवार काका-पुतण्यात ज्याच्यासाठी चुरस झाली असे उद्योजक असलेले नेते प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले. (Neither uncle nor nephewA big businessman is in BJP and can contest Lok Sabha elections from Baramati!)
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा आजचा क्षण आहे. रविदादांनी मला भारतातील आणि विश्वातील सर्वात मोठ्या पक्षात सामील करून घेतले, त्याबाबत त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदींच्या विचाराने प्रेरित होऊन मी प्रवेश करत असल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले.
सोनई उद्योग समूहाचे मालक असलेले माने पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आहेत. एकत्रित राष्ट्रवादी असताना ते राष्ट्रवादीचे नेते होते. राष्ट्रवादी फुटल्यावर कधी दादा तर कधी साहेबांच्या पक्षात होते. . नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारले आणि त्यांच्या जागी राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली. त्यावेळी प्रवीण माने यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. या निवडणुकीत त्यांना चाळीस हजाराच्या आसपास मते मिळाली. अपक्ष निवडणूक लढविल्यापासून ते शरदचंद्र पवार पक्षापासून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासूनही दूर गेले होते.