विशेष प्रतिनिधी
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील संशयित नीलेश चव्हाण याने फरार होताना फिरायला जाण्याच्या बहाण्याने मैत्रिणीला सोबत नेले. मात्र त्यामुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ( Nilesh Chavan gets caught in the police net because of his girlfriend)
नीलेशने फिरायला जाऊ असे सांगून मैत्रिणीला सोबत नेले आणि तिच्या मोबाईल फोनचा वापरही केला. मात्र याच चुकांमुळे तो अखेर अडकला गेला.पोलिसांचे लक्ष एका विशिष्ट मोबाइल नंबरकडे होते. त्या नंबरवर नीलेशने आपल्या मैत्रिणीच्या फोनवरून कॉल केल्याचे उघड झाले. त्या कॉलच्या आधारे पोलिसांना तिचा नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबविली. नीलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत असल्याची माहिती मिळवली.
यानंतर नीलेशने वेगळी चाल करत दिल्लीतून तो गोरखपूरला जाणाऱ्या एका खासगी बसमध्ये बसला. त्याची मैत्रीण पुण्यात परतली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. चौकशीत तिचा गुन्ह्यात थेट सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिला सोडण्यात आले.
मात्र, तिच्याकडून नीलेश ज्या बसने गोरखपूरला गेला त्या खासगी बसची माहिती मिळाली. हीच माहिती पोलिसांसाठी ‘क्लू’ ठरली आणि त्यांनी तत्काळ गोरखपूरला सापळा रचून नीलेश चव्हाणला ताब्यात घेतले.
दरम्यान, नीलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बावधन पोलिसांनी त्याच्या घराची दीड तास झाडाझाडती घेतली. यात शशांक, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तीन मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रोनिक गॅजेट देखील जप्त करण्यात आले आहेत.
नीलेश चव्हाणने पैशांची देवाणघेवाण करताना रोख रकमेचा वापर केला होता. पुण्यातून जाताना त्याने लाखो रुपये सोबत ठेवले होते. ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केला तर पोलिसांना कळेल म्हणून त्याने ही खबरदारी घेतली होती. त्याचसोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड ठेवले होते. नेपाळमध्ये देखील त्याने वेगळे सिम कार्ड खरेदी केले होते. प्रत्येकवेळी त्याने वेगवेगळ्या सिमचा वापर केला. कोणाला संपर्क करायचा असेल तर ऑनलाईन कॉल करायचा. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी देखील वकिलांशी त्याने ऑनलाईन कॉलिंगद्वारे संपर्क केला होता.