विशेष प्रतिनिधी
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही. कुठलीही हयगय केली जाणार नाही. अतिशय कडक अशी शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे, असे ठाम आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ( No one will be spared in Vaishnavi Hagavane death case Chief Minister assures)
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील नीलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही.
पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केली आहे. नेपाळला पळून जाण्याची तयारी होती परंतु पोलिसांनी बॉर्डरवरच त्याला अटक केली आहे. योग्य प्रकारचे इंटेलिजेंस प्राप्त करून हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला. त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की या प्रकरणातील कोणालाही सोडले जाणार नाही.
विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारची तक्रार आलेली आहे. त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी मी सांगितले आहे. कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासात दबाव आणू नये किंवा या तपासात गडबड करू नये या दृष्टीने आम्ही काही निर्णय घेतले आहेत.
लाडकी बहीण योजनेवर बोलताना फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळात याचा लाभ घेतला आहे हे माहीत असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात चौकशी करत आहोत. आम्हाला जे कोणी लोक असे आढळून येत आहेत आम्ही त्यांना कमी करत आहोत. अजून याचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती देऊ.