विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र पोलिसांवर अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संताप व्यक्त केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाडच्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आमदार गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
( Objectionable statement against police Chief Minister’s anger and case registered against MLA Sanjay Gaikwad)
महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा आरोप गायकवाड यांनी केला होता. यावर काल पुण्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत ते असे वारंवार बोलले तर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
संजय गायकवाड म्हणाले की, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला. मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिकाऱ्यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे.
संजय गायकवाड म्हणाले होते की, सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवले की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही, तर सगळे सुतासारखे सुरळीत होईल, असे गायकवाड म्हणाले.