विशेष प्रतिनिधी
नागपूर : एकीकडे जय हिंद यात्रा काढायची आणि दुसरीकडे आपल्या सैन्यावरच अविश्वास दाखवायचा? हे दुहेरी धोरण खपवून घेतलं जाणार नाही,” अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ( On one hand Jai Hind Yatraon the other handdistrust in the army Chief Ministers attack on Congress)
नागपूरजवळील खापरखेडा येथे रविवारी भाजपच्या तिरंगा यात्रेदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान’ अशा शब्दांत इशारा दिला. तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस स्वतः सहभागी झाले होते आणि त्यांनी एक किलोमीटर अंतर चालत यात्रा पूर्ण केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली असली तरी भारतीय सैन्याविषयीचा विश्वास दाखवला पाहिजे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळे सैन्यावरील विश्वास कमी होतो. भारतीय सेनेवर अविश्वास दाखवणाऱ्यांना ‘जय हिंद’ म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने ‘जय हिंद यात्रा’ काढली, ही स्वागतार्ह बाब असली तरी ती केवळ राजकीय यात्रा होऊ नये, ही आमची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलत आहेत, ते पाहता त्यांच्या वक्तव्यात भारतीय सेनेबद्दलचा अविश्वास दिसतो. जय हिंद’ तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने सेनेच्या पाठीशी उभे राहाल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानने गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम जाहीर केला. आज भारताची संरक्षणक्षमता पाकिस्तानपेक्षा चार ते पाच पटीने अधिक आहे. भारत जगातील पहिल्या पाच सामरिक शक्तींपैकी एक आहे. आज ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश हे आपल्या सैन्यबळाचे आणि ‘मेक इन इंडिया’ शस्त्रसज्जतेचे जिवंत उदाहरण आहे. आपला वॉर डॉमिनन्स युद्ध आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहायला मिळालं आहे. हे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या शस्त्रांमुळे करू शकलो. जेव्हा देशाचे प्रधानमंत्री 2014 मध्ये मेक इन इंडियाचा नारा द्यायचे तेव्हा लोक जुमला आहे असं म्हणत होते. मात्र, आता इतर देश आपल्याकडे शस्त्राची मागणी करत आहेत.
तुर्कीसारखा देश दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देतो, हे मानवतेविरोधातील अपराध असल्याची टीका करत, भारतीयांनी अशा देशांशी व्यवहार न करण्याचा घेतलेला निर्णय हा देशभक्तीचाच एक भाग आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी भारतीय जनतेचे यासाठी अभिनंदनही केले.
संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे केवळ शहरात नाही किंवा मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे, हे दर्शवलं पाहिजे. हे पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढली जात आहेअतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा खापरखेडा येथे काढण्यात आली. आशिष देशमुख यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं होतं. इथे पक्षाचा विषय नाही. ही भारताची तिरंगा यात्रा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.