विशेष प्रतिनिधी
पुणे: समाज कल्याण निरीक्षक पदाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान कॉपी करताना सापडल्याने तसेच दुसऱ्याचे प्रवेशपत्र दाखवून परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने वानवडी पोलिसांनी एका उमेदवारावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रामटेकडी येथील डिजिटल हब येथे हा प्रकार घडला. ( One arrested for cheating in social welfare inspector exam)
दत्ता सदाशिव टेंगले (रा. खांडनाळ, ता. जत, जि. सांगली) असे अटक झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष प्रकाश जाधव (वय ४९, रा. सोलापूर रोड, मांजरी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी आरोपी टेंगले हा समाज कल्याण निरीक्षक पदाची परीक्षा देण्यासाठी रामटेकडी येथील डिजिटल हब येथे परीक्षा देण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो कॉपी करताना आढळून आला. त्यावेळी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांनी त्याला केंद्रातून बाहेर काढले. तसेच वानवडी पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली.
मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी टेंगले हा पुन्हा परीक्षा केंद्रावर आला. त्याने दुसऱ्याचे प्रवेशपत्र दाखवून परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची फसवणूक करीत परीक्षा केंद्रामध्ये अनधिकृतपणे प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले.
रामटेकडी येथील डिजिटल हब येथील केंद्रनिरीक्षक संतोष प्रकाश जाधव यांनी वानवडी पोलिसांकडे याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी टेंगले विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक भोसले पुढील तपास करीत आहेत.