विशेष प्रतिनिधी
भरतपूर : महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप दिला पाहिजे आणि बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपींना नपुंसक केले पाहिजे, तेव्हाच अशा अत्याचारांच्या घटना कमी होतील, असा संताप राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला. (Only by castrating rapists can such incidents be prevented, says Haribhau Bagde)
राजस्थानातील भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात व्यासपीठावरून राज्यपाल बागडे बागडे बोलत होते. ते म्हणाले, एखाद्या महिलेचा विनयभंग होत असेल तर त्या पुरुषाला पकडा. तो माणूस आहे, तुम्हीही माणूस आहात आणि तुमच्यासोबत आणखी 2-4 लोक मदतीला येतील. विनयभंग करणाऱ्याला किंवा बलात्कार करणाऱ्याला रोखावे, मारहाण करावी, ही मानसिकता जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही.
बागडे म्हणाले, महाराष्ट्रात जेव्हा आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा गावचा एका पाटील होता. त्याने एका तरूणीवर बलात्कार केला. ते दुष्कृत्य समोर येताच शिवाजी महाराजांनी थेट आदेश दिला. ‘अत्याचार करणाऱ्याला जीवे मारू नका, त्याचे हात-पाय तिथल्या तिथे तोडा’, असे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. मरेपर्यंत तो पाटील तशाच अवस्थेत राहिला.
गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही हेच कळत नाही. मात्र 12 वर्षांखालील मुलाचा कोणी विनयभंग केला, बलात्कार केला किंवा लैंगिक अत्याचार केले, तर त्याची शिक्षा फाशीची आहे, तरीही असे गुन्हे थांबत नाहीत . अशा प्रकरणांची रोजच सुनावणी होताना दिसते. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचे यावरून दिसून येते. कायद्याच्या भीतीसाठी काय करावे, तुम्ही कल्पना तरी करू शकता का ? तुम्ही सूचना देऊ शकता, कायदा असतानाही अशा घटना का घडतात? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असेही बागडे म्हणाले.