विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांमध्येच भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आहे. या एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सैन्यदलाचे कौतुक केले आहे. ( Opposition leaders including Rahul GandhiSharad Pawar praise Operation Sindoor)
जम्मू-काश्मीरातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांनी कोण कोणत्या धर्माचे आहे, याची विचारणा केली. यानंतर त्यांनी हिंदू धर्मीय असलेल्या पुरुषांवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली. भारताने या हल्ल्याचा बदला लवकरच घेतला पाहिजे, अशी भावना भारतीय व्यक्त करत होते. त्यानंतर आता पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांमध्येच भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आहे. या एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर या कारवाईमध्ये आम्ही भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची भावना विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी (ता. 7 मे) मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “आपल्या सैन्याचा अभिमान आहे. जय हिंद!” अशी पोस्ट केली आहे. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्ही भारतीय सैन्याच्या आणि सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असे आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.
शरद पवार यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सैन्यदलाचे आणि सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले,
आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!”
भारतीय सैन्याने बुधवारी (ता. 7 मे) मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील एकूण 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे.