विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भेटीचे निमित्त साधून महाविकास आघाडीच्या वतीने विधिमंडळात विरोधी पक्षनेते पदावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. ( Opposition parties clash over opposition leaders post on the pretext of meeting with Chief Justice)
विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाला मंगळवारी (8 जुलै) सुरुवात झाली. एकीकडे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार महाराष्ट्र विधानमंडळातर्फे करण्यात येणार आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी असणार असल्याची चिंता व्यक्त करत विरोधकांनी विधानसभेत गदारोळ सुरु केला. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी दोघेही आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी भास्करराव जाधव विनंती करेन, की हा मुद्दा जो आपण मांडत आहात त्याला काही हरकत नाही. पण मी अशी विनंती करतो की सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जी काही चर्चा करून निर्णय करायचा आहे.
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी बोलायची संधी देतो पण एक लक्षात घ्या, विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत. या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे? हे तुम्ही ठरवा. हे माझे अधिकार असताना या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात. या संदर्भात मी आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे. योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केले आहे. त्यानंतर सभागृहात या विषयाची चर्चा करणे कितपत योग्य आहे. प्रथा परंपरेसाठी हे आहे का? मला वाटत नाही हे योग्य आहे.
आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले की, “मी हेच सांगत होतो, आपल्याला मी हीच विनंती करण्यासाठी उभा आहे. मी आपल्याशी वाद घालण्यासाठी उभा नाही. आम्ही आपल्याला येऊन तिन्ही पक्षाचे लोक आम्ही प्रमुख पदाधिकारी येऊन आपल्याला भेटलो. आपल्याला मी पत्र दिले मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो. दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनाही भेटलो. शेवटी सनदशीर मार्गाने हा विषय सुटावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. हा विषय आमच्या सहकाऱ्यांनी काढला. अध्यक्ष महोदय आपण हा निर्णय घेणार तो कधी घेणार? हे जर आत्ता एका मिनिटात सांगितले तर एका सेकंदात आम्ही बसतो. आज या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत, त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो? हे आम्हाला सांगावे लागणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यावेळी म्हणाले की, “मुख्य न्यायाधीश येणार असून त्यांचे स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. पण विधिमंडळाने त्यांचे स्वागत करताना महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या परंपरेत विधानसभेत विरोधी पक्ष नेताच नाही. अशी परिस्थिती असणे योग्य नाही. म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा ही विनंती.” असे म्हणत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, “भास्करराव जाधव यांनी आज जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो माझ्या विचाराधीन आहे. मी लवकरात लवकर सगळ्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून प्रथा परंपरेंचा विचार करून लवकरच निर्णय घेईन,” असे सांगितले.
विरोधी पक्षनेतेपदावर आताच निर्णय घ्या, अशी मागणी करत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर अभिनंदनपर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतरही भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि अध्यक्षांनी पुन्हा यावर लवकरच विचार करू असे आश्वासित केले.