विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमच्या संस्था टिकाव्या, आमचे कारखाने टिकावे, कारखान्यावर आमची माणसे टिकावी म्हणून आमचे राजकारण नाही. आम्ही असतो तर अशा व्यासपीठावरही गेलो नसतो, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना लगावला आहे. ( Our politics is not about the survival of institutions and factories Sanjay Raut hits out at Sharad Pawar)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एकाच मंचावर आले होते. यावर संजय राऊत यांनी शरद पवारांवर आगपाखड केली आहे. ते म्हणाले, आम्हाला मधल्या काळात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विषयी वाटले होते की, आता संघर्ष सुरू राहील. आमचा देखील संघर्ष सुरू आहे. पण, दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळात पवार साहेबांचा अपमान केला, त्याची आम्हाला खंत वाटते आहे. पण जर आम्ही असतो तर अशा व्यासपीठावरही गेलो नसतो. हे सहकार आणि इतर विषय नंतर… आमच्यामुळे काही अडत नाही, आपल्यामुळे राष्ट्र आणि जग अडते यातून राजकारण्यांनी बाहेर पडावे.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आमच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका जरूर आहे. पण आमच्या संस्था टिकाव्या, आमचे कारखाने टिकावे, कारखान्यावर आमची माणसे टिकावी म्हणून आमचे राजकारण नाही. आमचे राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचे राजकारण आहे. जे येतील ते आमच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र आहे. आला तर सोबत नाहीतर तुमच्याविना संघर्ष सुरू राहणार,.
आम्ही संघर्ष करणारच आहोत. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकूमशाही विरोधात आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला महाराष्ट्र कंगाल केला. मराठी अस्मितेच्या विरुद्ध ज्यांचे कारस्थान सुरू आहे, त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. जे आमच्या सोबत यायला तयार आहेत त्यांना सोबत घेऊ नाहीतर त्यांच्या शिवाय हा संघर्ष सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा हाच संघर्ष केला. आम्ही त्यांच्यासोबत आयुष्यभर काम केलेली माणसे आहोत, असेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले.