विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र आहे. भारतावर पुन्हा हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानने शंभर वेळा विचार करावा, इतकं कठोर उत्तर दिलं जावं, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठीपंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. ( Owaisi appeals to PM teach Pakistan such a lesson that it should think a hundred times again)
दिल्लीतील एका जाहीर सभेत बोलताना ओवैसी म्हणाले, “आम्हाला आशा आहे की पंतप्रधान पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात आणि पाकिस्तानसारख्या अपयशी राष्ट्राविरोधात ठोस पावलं उचलतील. त्यांना असा धडा शिकवावा की पुन्हा भारतावर हल्ला करण्याची हिंमत होणार नाही.”
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताकडून पुरावे मागितले. यावर टीका करताना ओवैसी म्हणाले, “पठाणकोट हल्ल्यानंतर आपण त्यांना एअर फोर्स बेसवर नेले. त्यांनी स्वतः डोळ्यांनी सगळं पाहिलं, पण तरीही त्यांनी दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. आता पुन्हा पुराव्याची मागणी करत आहेत, हे अत्यंत निर्लज्जपणाचं लक्षण आहे.
ओवैसी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या २६ नागरिकांना अधिकृतरित्या “शहीद” घोषित करण्याची मागणी केली. “दहशतवादाचा बळी पडलेल्यांना राजकीय चर्चेचा विषय बनवू नका. त्यांना सन्मान द्या, शहीद म्हणून मान्यता द्या,” असे ते म्हणाले.
२००८ च्या मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत ओवैसी म्हणाले, “तेव्हा निजामाबादच्या एका तरुणीचा नुकताच विवाह झाला होता. ती तिच्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर होती. तेव्हाच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तिचा मृत्यू झाला. हा अनुभव आमच्यासाठी जखम आहे. पण पाकिस्तान आजही हे मान्य करत नाही की त्यांच्या भूमीतून दहशतवादी भारतात येतात.”
भावनांमध्ये वाहून न जाता मी पूर्ण जबाबदारीने सांगतो की आता उत्तर देण्याची वेळ आहे, आत्मपरीक्षणाची नाही. जर आपण आता प्रत्युत्तर दिलं नाही, तर दर काही महिन्यांनी आपल्याला पुन्हा अशा हल्ल्यांचा सामना करावा लागेल – मग त्याचे बळी लष्करी, सीआरपीएफ जवान असोत, की निष्पाप काश्मिरी नागरिक असे ओवैसी म्हणाले.
ओवैसींनी बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी फजलूर रहमान यांनाही सुनावले आहे. रहमान यांनी म्हटले होते की, भारताने पाकिस्तानवर कारवाई केल्यास बांगलादेशने भारताच्या सातही ईशान्य राज्यांवर ताबा मिळवावा. यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, “बांगलादेशचे अस्तित्व भारतामुळे आहे. त्यांनी अशी मूर्खपणाची वक्तव्ये करणं थांबवावं.