विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करत हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे एनआयए औपचारिकपणे या हल्ल्याच्या सर्व पैलूंवर सखोल चौकशी करणार आहे. ( Pahalgam terror attack probe handed over to NIA Home Ministrys big decision)
सूत्रांच्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर एनआयएचे पथक पहलगाममध्ये तळ ठोकून तपास करत होते. आता अधिकृतपणे संपूर्ण तपास त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एनआयएने स्थानिक पोलिसांकडून यापूर्वी संकलित केलेली सर्व माहिती, केस डायरी, एफआयआर आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, व्यापक तपास सुरू केला आहे.
पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य धोके रोखण्यासाठी ही जबाबदारी देशातील प्रमुख दहशतवादविरोधी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे.
एनआयए लवकरच हल्ल्याच्या सर्व अंगांचा तपास करेल. कट कसा रचला गेला, कोणत्या दहशतवादी संघटना सहभागी होत्या, स्लीपर सेलचा धोका काय आहे – या सर्व बाबींचा शोध घेऊन गृह मंत्रालयाला सविस्तर अहवाल सादर केला जाईल.
हल्ल्याचे गांभीर्य ओळखून निर्णय
सुरुवातीला जम्मू-काश्मीर पोलीस तपास करत होते. मात्र, हल्ल्याचे गंभीर स्वरूप, देशातील नागरिकांच्या सुरक्षेची गरज आणि मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कटाचा संशय लक्षात घेता हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांनी संरक्षण यंत्रणांची फसवणूक करत थेट बैसरन येथे घुसखोरी केली आणि पर्यटकांवर बेधुंद गोळीबार केला. या अमानुष हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा बळी गेला. त्यामुळे देशाच्या संरक्षण यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता एनआयएसमोर केवळ गुन्हेगारांना पकडण्याचे नाही तर संपूर्ण कटाचा उलगडा करून देशवासीयांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचेही मोठे आव्हान आहे.