विशेष प्रतिनिधी
जैसलमेर (राजस्थान) : भारतीय हद्दीत घुसखोरी करताना पाकिस्तानचा एक एफ-१६ लढाऊ विमान पाडण्यात आले असून, या विमानाचा वैमानिक भारतीय सुरक्षा दलांच्या हाती जिवंत लागला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जलद कारवाई पथकाने (QRT) त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. (Pakistan attack foiledPakistani fighter pilot captured alive in Jaisalmer)
गुरुवारी उशिरा पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करण्याचा दुसरा प्रयत्न केला गेला. मात्र, भारताच्या सशक्त वायूदल आणि S-400 यांसारख्या हवाई संरक्षण यंत्रणांनी हे सर्व हल्ले वेळेत निष्प्रभ केले.
पाकिस्तानकडून जम्मू विमानतळ, उधमपूरमधील सैनिकी तळ, अखनूर, पठाणकोट, गुरदासपूर आणि जैसलमेरसारख्या महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. जम्मू विद्यापीठाजवळ दोन पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. कच्छ परिसरातही ड्रोन दिसले होते.
भारतीय प्रत्युत्तरात्मक कारवाई गुरुवारी उशिरा तीव्र झाल्यानंतर एक पाकिस्तानी वैमानिक पकडण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. सरकारी सूत्रांनी लाहोर आणि इस्लामाबादसह अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले झाल्याची पुष्टी केली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) संपूर्ण ब्लॅकआउट झाल्याची नोंद आहे. पकडण्यात आलेल्या वैमानिकाबाबत अद्याप अधिकृत पुष्टि झालेली नाही. आतापर्यंत पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत. त्यापैकी एक विमान राजस्थानमधील जैसलमेर सेक्टरमधील पोखरणच्या लाठी भागात पाडण्यात आले, अशी माहिती आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक भागांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव विजेचा पुरवठा बंद करण्यात आला होता. याचवेळी जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक एस.पी. वैद यांनी “माता वैष्णोदेवी आपल्यासोबत आहे, तसेच भारतीय सशस्त्र दल देखील,” असा विश्वास सोशल मीडियावर व्यक्त केला.
या हल्ल्यानंतर भारताने लगेच ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील लाहोर, सियालकोट, इस्लामाबाद आणि कराची येथील हवामान रडार आणि एक ए.डब्ल्यू.ए.सी.एस. प्रणाली नष्ट केली. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) आणि सीमाभागातील दहशतवादी तळ देखील उद्ध्वस्त करण्यात आले.
पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीप्रमाणे, पाकिस्तानने सकाळी सुद्धा १५ भारतीय शहरांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यालाही भारतीय वायू संरक्षण यंत्रणांनी यशस्वीपणे हाणून पाडले. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानला तात्काळ तणाव कमी करण्यास सांगितले असून, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्वरित संपर्क साधला. ही २४ तासांत दुसरी मोठी कुरापत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.