विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पहलगाम येथे २२ एप्रिलला २६ हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येनंतर, संपूर्ण भारतभरातून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार घाबरून गेले असून, संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी भारताकडून हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करत देशात “अलर्ट” घोषित केला आहे.
( Pakistans fear of Indias decisive action defensive role by threatening nuclear weapons)
“भारत कोणत्याही क्षणी सैनिकी कारवाई करू शकतो. आम्ही आमच्या सैन्याला पूर्ण सज्ज ठेवले आहे. जर आमच्या अस्तित्वाला थेट धोका झाला तर अण्वस्त्राचा वापर करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही,” असा थेट इशारा दिला.
भारताने हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) वर ठेवली आहे. प्राथमिक तपासातही दोन दहशतवाद्यांचे पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी पाकिस्तानने नेहमीच्या सवयीप्रमाणे आरोप फेटाळून “आंतरराष्ट्रीय चौकशी”ची मागणी केली आहे — जणू काही जगाने पुन्हा त्यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवावा.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी निष्पक्ष चौकशीची तयारी दाखवली असली, तरी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या या प्रस्तावाला “ढोंगी आणि फसवा” असे म्हणत धुडकावून लावले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर सलग चौथ्या दिवशी गोळीबार झाला. भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे की “२७-२८ एप्रिल दरम्यान पाकिस्तानकडून अनावश्यक आणि उगाच उचकलेला गोळीबार करण्यात आला, परंतु भारताने संयम राखला आहे.” जीवितहानी झाली नसली तरी पाकिस्तानची कुरापती सुरू आहेत.
हल्ल्यानंतर TRF ने जबाबदारी घेतली होती, मात्र भारताच्या प्रचंड दबावामुळे त्यांनी तीन दिवसांतच माघार घेतली आणि “आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सायबर हल्ला झाला होता” असा हास्यास्पद दावा केला.
शरीफ यांनी २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राईकची आठवण काढत, “पाकिस्तानने मोजक्या पण ठोस प्रतिसाद” दिला होता असे म्हटले. मात्र संपूर्ण जगाला ठाऊक आहे की बालाकोटच्या धडकीमुळे पाकिस्तान आजही भारताच्या ठोस कारवाईच्या भीतीत आहे.