विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने २६ पेक्षा अधिक ठिकाणी पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न हणून पडले आहेत.पश्चिम सीमांवर पाकिस्तान सातत्याने ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे आणि फायटर जेट्स वापरून भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले करत आहे, अशी माहिती लष्कराच्या वतीने कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. ( Pakistans infiltration attempt in India foiled at 26 places says Colonel Sophia Qureshi Pakistans infiltration attempt in India foiled at 26 places says Colonel Sophia Qureshi)
भारताच्या S-400 प्रणालीला नष्ट केल्याचे आणि सिरसा व सुरत येथील हवाई तळांना हानी पोहोचवल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचा पूर्णपणे इन्कार करत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले कि भारत नव्हे तर पाकिस्तानच वारंवार चिथावणीखोर कृत्ये करत आहे.
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तान भारतावर सतत क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. त्यांनी हायस्पीड क्षेपणास्त्रे डागली. उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूज हवाई तळांवर हल्ला केला. पाकिस्तानने रुग्णालये आणि शाळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हाणून पाडला. ब्रह्मोस सुविधा नष्ट करण्याचा दावा खोटा आहे. S400 संरक्षण प्रणाली देखील पूर्णपणे सुरक्षित आहे.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून आपल्या सैन्याची हलचाल पुढील भागांकडे केली जात असून त्यातून चिथावणीखोर कारवायांचे संकेत मिळत आहेत. मात्र, भारतीय सैन्य पूर्ण सज्ज असून शत्रूच्या प्रत्येक हालचालीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
शुक्रवारी पाकिस्तानने २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न केले होते, ज्याला भारतीय सैन्याने प्रभावी प्रत्युत्तर देत प्रत्येक ड्रोन लक्ष्य करत निष्प्रभ केलं. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, हे हल्ले बारामुल्ला ते गुजरातमधील भुजपर्यंत करण्यात आले होते. भारताने रावळपिंडी (चकला), चकवाल आणि शोरकोटमधील हवाई तळांवर हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानने केला असला तरी यास कोणतेही पुरावे नसल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
शनिवारी पहाटे जम्मू, श्रीनगर आणि उधमपूरसारख्या शहरांमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. राजौरीमधील पाकिस्तानी गोळीबारात जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नंतर या परिसरांना भेट दिली आणि थापा कुटुंबीयांना भेटून संवेदना व्यक्त केल्या.
नागरिक विमान वाहतुकीच्या दृष्टीनेही भारताने महत्त्वाचे पावले उचलली आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने शनिवारी घोषणा केली की, देशातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा १५ मे रोजी सकाळी ५:२९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यासोबत दिल्ली आणि मुंबईच्या फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजनमधील २५ ATS रूट्स तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. ३२ विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय ९ मे ते १४ मे या कालावधीसाठी लागू राहील.
भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले. या कारवाईत किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली होती.