विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या २६ हिंदू पर्यटकांपैकी सुमारे २० जणांच्या पँट दहशतवाद्यांनी खाली ओढल्या किंवा झिप उघडली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे. ( Pants of 20 people pulled down to confirm they were Hindus shot after checking religion)
लष्कर, जम्मू-कश्मीर पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त तपास पथकाने केलेल्या प्राथमिक तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली आहे.हल्लेखोरांनी प्रथम पीडितांचे नावे आणि धर्म विचारले आणि त्यानंतर त्यांना ‘कलमा’ म्हणायला लावले. जे व्यक्ती कलमा म्हणू शकले नाहीत, त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवाय, दहशतवाद्यांनी पीडितांची ओळख पटवण्यासाठी त्यांची ओळखपत्रे तपासली आणि हिंदू असल्याची खात्री करण्यासाठी त्यांच्या शरीराबाबतही पडताळणी केली, कारण इस्लाम धर्मानुसार सुंता अनिवार्य आहे.
तपास यंत्रणांनी आतापर्यंत सुमारे १५०० दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यामधून ७० जणांवर विशेष संशय व्यक्त करण्यात आला आहे. या चौकशीतून लवकरच मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा दावा जम्मू-कश्मीर प्रशासनाने केला आहे.
हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले आसाम विद्यापीठाचे प्राध्यापक देबाशीष भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांनी कलमा उच्चारल्याने दहशतवाद्यांनी त्यांना वाचवले. पुण्याच्या संतोष जगदाळे यांना मात्र दहशतवाद्यांनी इस्लामी कलमा म्हणण्याची मागणी केली होती. ते तसे करू न शकल्याने त्यांच्या डोक्याच्या मागे आणि पाठीवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
बंगळुरूचे भारत भूषण यांच्यावर तर त्यांच्या पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलासमोरच गोळ्या झाडण्यात आल्या.