विशेष प्रतिनिधी
पुणे : आई-वडिलांनीच पैशांसाठी ४० दिवसीय बालिकेची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. (Parents sell 40-day-old baby girl for Rs 3.5 lakh for money)
मीनल ओंकार सपकाळ (३०, रा. बिबवेवाडी), ओंकार औदुंबर सपकाळ (२९, रा. बिबवेवाडी), साहिल अफजल बागवान (२७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (३४, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (४४, रा. येरवडा) आणि दीपाली विकास फटांगरे (३२, रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाल न्याय अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीनल सपकाळ ही पहिल्या पतीपासून वेगळी राहत आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. सध्या ती ओंकार सपकाळ याच्यासोबत राहत आहे. २५ जून २०२५ रोजी मीनल प्रसृत झाली. तिला मुलगी झाली. मीनल प्रसृत झाल्यानंतर मध्यस्थ बागवान, पानसरे, अवताडे यांनी तिच्याशी संपर्क साधला. ४० दिवसांच्या मुलीला दीपाली फटांगरे हिला देण्यास सांगितले. त्याबदल्यात साडेतीन लाख रुपये देतो, असे आमिष मध्यस्थांनी दीपालीला दाखवले. मध्यस्थांनी दोन लाख रुपये सपकाळ दाम्पत्याला दिले. मध्यस्थांना फटांगरेने जास्त रक्कम दिल्याचा संशय सपकाळ यांना आला. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला.त्यानंतर सपकाळ येरवडा पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांना त्यांनी आमची मुलगी पळवून नेली असे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मध्यस्थ आणि मुलगी विकत घेणारी दीपाली फटांगरे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आई-वडिलांनी मध्यस्थांमार्फत बालिकेची फटांगरेला विक्री केल्याचे उघडकीस आले. फटांगरेला हिला कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पार न पाडता साडेतीन लाख रुपयांत सपकाळने विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सपकाळ यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.