विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : पहलगाममधील २६ पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर एक हल्लेखोराचा धक्कादायक फोटो समोर आला आहे. या फोटोत दहशतवाद्याच्या हातात बंदूक स्पष्टपणे दिसत असून, चेहरा मात्र अस्पष्ट आहे, त्यामुळे त्याची ओळख पटवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रयत्न करत आहेत. ( Photo of attackers in front Search operation accelerates after Pahalgam attack NIA active)
हा फोटो हल्ल्यानंतर काही मिनिटांतच घटनास्थळी घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या हा फोटो एनआयएच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यावरून चेहरा ओळखण्यासाठी आणि डिजिटल विश्लेषणासाठी फॉरेन्सिक टीम कार्यरत झाली आहे.
हल्ल्यानंतर पहलगाम आणि बैसारन खोऱ्यात सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून संयुक्त शोधमोहीम राबवली जात आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जंगलातील हालचालींवर नजर ठेवली जात आहे.
एनआयएच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासाला गती दिली असून, दहशतवाद्यांचे आणखी दोन स्केच आज जाहीर करण्यात आले आहेत. हल्ल्याचा हेतू आणि त्यामागील कट रचणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा कटाक्ष आहे.
दरम्यान, हल्ल्यात धर्म विचारून पर्यटकांना लक्ष्य केल्याची गंभीर माहिती उघड झाली आहे. काही जखमी पर्यटकांनी सांगितले की, “कलमा” म्हणायला लावून काहींवर थेट गोळीबार करण्यात आला.
. हल्ल्यातून वाचलेल्या काही व्यक्तींनी दिलेल्या जबाबांनुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारून निवडून लोकांना लक्ष्य केले.
हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पर्यटक विविध राज्यांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली येथून आलेल्या कुटुंबांनाही या हल्ल्याचा फटका बसला आहे. काही मृत पर्यटकांचे मृतदेह पहलगाम हॉस्पिटलमधून श्रीनगरला हलवण्यात आले आहेत. सरकारने जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे.