विशेष प्रतिनिधी
पुणे : वाढत्या उष्णतेमुळे शहरातील पाण्याची मागणी वाढली आहे. तरीही सोसायट्यांकडून जादा पाणी वापर होत असल्याचे समोर आले आहे. जादा पाणी वापरल्यास नळ कनेक्शन तोडले जाणार असल्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
महापालिकेकडून समान पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला जात आहे. समान पाणीपुरवठा योजनेनुसार जलवाहिन्या टाकण्याचे काम तसेच किती पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. याची माहिती घेतली जात आहे. समान पाणी योजने अंतर्गत शहरातील सोसायट्या तसेच स्वतंत्र निवासी मिळाकतींना पाण्याचे मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरमुळे पाण्याचा अधिक वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी वापर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अशा सोसायट्या,घरांना पाण्याचा वापर कमी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही या सोसायट्या पालिकेच्या नोटीसांना जुमानत नसल्याचे दिसून येते. त्यावर आता महापालिकेने थेट कारवाईचा बडा उगारण्याचे धोरण स्वीकारले आहे. आता नोटीस पाठविण्यापेक्षा थेट त्यांचा पाणीपुरवठाच बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच तातडीने टाक्यांची गळती तसेच पाणी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महापालिकेकडून शहरात समान पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत पालिकेकडून शहरातील पाणीपुरवठ्याचे १४१ झोन तयार करण्यात आले आहेत. त्यातील ४७ झोन तयार झाले आहेत. तर, ४१ झोनमध्ये मीटरद्वारे मुख्य टाकीतून सोडण्यात आलेले पाणी, सोसायटीच्या टाकीत पडलेले पाणी याची मोजणी केली जात आहे. त्यानुसार,प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे सोसायटीने पाणी घेणे आवश्यक आहे. मात्र, काही सोसायट्यांचा पाणी वापर ५०० ते ६०० लीटर पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे, अशा सोसायट्यांची पाहणी महापालिकेने केली असता सोसायटीच्या टाकीला गळती असणे, टाकी भरल्यानंतर पाणी बंद करणारी यंत्रणा नसणे, टाकी भरल्यानंतरही पाणी बंद केले जात नसल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांना महापालिकेने जादा पाणी वापराच्या नोटीसा देत पाणी वापर कमी करावा तसेच पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्याकडे दूर्लक्ष होत असल्याने पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.