विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणेकरांचा पीएमपी बसचा प्रवास आता महागणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ( PMP ticket prices increase monthly passes will also increase)
पीएमपी पुणे l, पिंपरी चिंचवड शहर व पीएमआरडीए च्या कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता माफक दरात बससेवा पुरविण्यात येते.
दररोज १२ लाखांहून प्रवासी प्रवास करतात.
पीएमपी सेवा तोट्यात आहे. कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार तसेच इंधन दरात झालेली वाढ यामुळे पीएमपीवर आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली नव्हती. पीएमपीच्या संचालक मंडळाने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड पालिका हद्दीकरीता प्रचलित असलेल्या दैनिक पास ४० रूपये (एक पालिका हद्दीकरीता) व मासिक पास ९०० रुपये (एक पालिकाा हद्दीकरीता) असलेले दोन्ही पासेस रद्द करून दोन्ही पालिका हद्दीकरीता एकच दैनिक पास ७० रुपयांचा व मासिक पास १,५०० रुपयांचा इतका करण्यात आलेला आहे.
पीएमआरडीए हद्दीकरीता दैनिक पास १२० रूपयांऐवजी १५० रूपये इतका करण्यात आलेला आहे. विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या पासेस व पीएमआरडीएच्या मासिक पासमध्ये कोणताही बदल
करण्यात आलेला नाही.
पीएमपीने किलोमीटर आधारित स्टेज रचनेत सहरचना करून ५ व १० कि.मी अंतराने बस संचलनाचे १ ते ८० कि.मी. करीता ११ स्टेज करण्यास मा. संचालक मंडळाच्या १३ मे रोजीच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे. पीएमआरडीए यांचेकडून ५०० नवीन स्वमालकीच्या सीएनजी बसेस खरेदी करीता २३० कोटी रूपयांची तरतूद करून अल्पकालावधीत पीएमपीकडे बसेस उपलब्ध होणार आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड यांच्या स्वामित्व हिश्श्यानुसार ५०० नवीन स्वमालकीच्या सीएनजी बसेस उपलब्ध होणार आहे. पीएमपीच्या सेवकांच्या वेतनावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने बाह्य संस्थेकडून कंत्राटी पध्दतीने आवश्यक सेवक घेण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.