विशेष प्रतिनिधी
पुणे : शहराच्या सीमेलगत असलेल्या आळंदी म्हातोबाची येथे एक शेतकऱ्याने स्वत:च्या जमिनीत चक्क अफुची शेती केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी याठिकाणी कारवाई करीत ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ( Police arrest farmer cultivating opium in Alandi Mhatobachi)
मंगल दादासो जवळकर (वय ४५, रा. अमराई वस्ती, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या जागा मालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची येथील जगताप मळा रोडच्या कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांच्या प्लॉटिंगच्या मागील बाजूला अफूची लागवड केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा घालून कारवाई केली. आळंदी म्हातोबाची येथील गट नंबर ७७५ मध्ये एकूण ४० हजार रुपयांची ४ किलोग्रॅम वजनाचे ६६ अफूची झाडे मिळून आली. पोलिसांनी ही झाडे जप्त केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार क्षीरसागर, वणवे, सातपुते, पोलीस अंमलदार कटके, कुदळे, नानापूरे, निकंबे, यादव, तेलंगे यांनी केली आहे.