विशेष प्रतिनिधी
पुणे : युवकांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक शांतता आणि सौहार्द यांसारख्या महत्वाच्या विषयांवर सरकारला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने काढलेली पदयात्रा पोलिसांनी अडवली. लालमहल, पुणे ते मुंबई विधानभवनाकडे निघालेल्या ‘युवा आक्रोश’ पदयात्रेला पुण्यातील शिवाजीनगर येथे पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देत अडवले आणि कार्यकर्त्यांना अटक केली. (Police stop Youth Congress’ march)
युवक कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, सह प्रभारी एहसान खान, बंटी शेळके, सोनललक्ष्मी घाग, प्रशांत ओगले, श्रीनिवास नालमवार, वैष्णवी किराड, माध्यम विभाग अध्यक्ष अक्षय जैन, अजित सिंह, विजय चौधरी, प्रथमेष आणावे, ऋत्विक धनवट, अमोल दौंडकर, सौरभ आमराले, महेश टावरे,चंद्रशेखर जाधव, उमेश पवार, कौस्तुभ नवले, राहुल शिरसाट, अतुल पेडेवाड आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभारी चिकारा म्हणाले, बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना न्याय मिळावा, महिलांनी सुरक्षित वाटावे, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळावे, तसेच राज्यात सामाजिक एकता आणि शांततेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसने ही पदयात्रा सुरू केली होती. दुर्दैवाने, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा हक्क असतानाही, सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी ही यात्रा थांबवून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
तर, प्रदेशाध्यक्ष राऊत म्हणाले, आमचे आंदोलन कोणत्याही हिंसेशिवाय शांततेच्या मार्गाने पुढे नेले जात असताना, पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसने नेहमीच तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे आणि पुढेही उठवत राहील. आम्ही अशा दबावाला भीक घालणार नाही आणि लवकरच आणखी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू.
याविषयी बोलताना माध्यम विभाग अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, येत्या १९ तारखेला अधिक ताकदीने युवक कॉंग्रेस तर्फे विधानभवनाला घेराव घालण्यात येणार आहे. युवकांचा आवाज या बहिऱ्या सरकारला जाग आणण्याचे काम करेल. ही लढाई महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आहे आणि ती शेवटपर्यंत लढली जाईल.