विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजपसाेबत जाण्याचा निर्णय दाेन ते तीन वेळा अंतिम झाला हाेता. मात्र नंतर भूमिका बदलण्यात आली असा गाैप्यस्फाेट करत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.( Praful Patel takes a direct aim at Sharad Pawar reminds him of his decision to join BJP and later backtracked)
राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आयाेजित करण्यात आलेल्या वर्धापनदिन साेहळ्यात अजित पवार यांच्या समाेरच प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांनी भूमिका कशी बदलली हे सांगितले. ते म्हणाले भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बरोबर जाण्याचा प्रयत्न २०१४ पासून सुरू होता. त्याबाबत दोन ते तीन वेळा अंतिम निर्णय देखील झाला होता. मात्र त्यानंतर भूमिका बदलण्यात आली. काँग्रेसचे सरकार असताना २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते. शरद पवार मंत्रिमंडळात होते. त्यावेळी दहशतवाद्यांवर काहीही कारवाई झाली नाही. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. २६ नागरिकांना धर्माच्या आधारावर हत्या करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत काय करू शकते हे करून दाखविले.
यावेळी बाेलताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही आणि भविष्यातही मान्य असणार नाही. शोषित, वंचित, मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजासाठी काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे.
अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. सत्ता येईल आणि जाईल, पण पुरोगामी विचार जिवंत राहिले पाहिजेत. आपल्या सगळ्यांच्या अधिकारांचे रक्षण होणे गरजेचे आहे. विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्यालाच राष्ट्रवादी कॉग्रेस संधी देणार आहे.
पवार म्हणाले, मला आजही १० जून १९९९ हा दिवस आठवतो. शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळालं नाही. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावं लागलं. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. कारण केंद्रात देखील कुणाला यूपीए किंवा कोणाला एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे.