विशेष प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. अजित पवारांसमोरच गोंधळ घातला. कार्यक्रमस्थळी असलेल्या पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘बच्चू कडूंना न्याय द्या’ अशा शब्दांत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
( Prahar Sanghatana workers protest at Deputy Chief Minister Ajit Pawars program in Pune demanding loan waiver)
बच्चू कडू यांचं मागील ७ दिवसापासून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी उपोषण सुरु आहे. काल पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत कर्जमाफीबद्दल आश्वासन दिले, तुम्ही उपोषण सोडा अशी विनंती त्यांनी बच्चू कडू यांना केली होती. मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाहीच अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.
शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनाबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन सरकारतर्फे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मात्र जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत लढा सुरु राहील. येत्या ३० जूनला अधिवेशनामध्ये कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, त्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करू असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र सध्या ज्या शेतकऱ्यांकडे जूने कर्ज आहे, आणि सध्याच्या परिस्थितीत हे कर्ज फेडणं त्याला शक्य नाही अशा शेतकऱ्यांच्या मागे पैशासाठी तगादा लावू नये, उलट कर्जमाफी होईपर्यंत या शेतकऱ्यांना नवीन कर्ज सरकारने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
आपल्या अन्नत्याग आंदोलनाला आत्तापर्यंत ५० ते ६० आमदारांनी पाठिंबा दिला. काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, शिंदे गटाचे काही आमदार असो वा मनोज जरांगे पाटील आणि राजू शेट्टी असोत, ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांशी बोलून आपण पुढचा निर्णय जाहीर करू. अन्नत्याग आंदोलन शेवट्पर्यंत नेल्याशिवाय हा बच्चू कडू स्वस्त बसणार नाही, कर्जमाफी झाली नाही तर काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने बघू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. आज दुपारनंतर ते कार्यकरर्त्यांशी तसेच ज्यांनी ज्यांनी उपोषणाला पाठींबा दिला त्या नेत्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहेत, असे कडू यांनी सांगितले आहे.