विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मराठी भाषा अमृताहुनी गोड आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत असलेल्या माझ्या प्रेमाविषयी तुम्ही जाणता, असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषण करत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.
नवी दिल्लीत आजपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी म्हटले की, आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. त्यामुळे दिल्लीत साहित्य संमनेलासाठी तुम्ही अतिशय चांगला दिवस निवडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असताना हे मराठी संमेलन होत आहे. मित्राने मी जेव्हा मराठीचा विचार करतो, तेव्हा मला संत ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवतात. मराठी भाषा अमृताहुनी गोड आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत असलेल्या माझ्या प्रेमाविषयी तुम्ही जाणता. मी मराठी भाषेतील अनेक शब्द शिकण्याचा प्रयत्न करत असतो.
पंतप्रधान म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमीवरील एका महापुरुषाने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना केली होती. संघ गेल्या 100 वर्षांपासून काम करतो आहे. संघामुळे माझ्यासारखे लाखो लोकांना देशासाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा मिळाली आहे. संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली. काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. देश आणि जगात 12 कोटींहून अधिक मराठी भाषिक लोक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते.