विशेष प्रतिनिधी
आदमपूर : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली. या भेटीत त्यांनी भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांशी व जवानांशी संवाद साधला. या भेटीमुळे एअरबेसवर नवचैतन्य संचारून जवानांचा उत्साह वाढलाच पण त्याचबरोबर पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल झाली. ( Prime Minister Narendra Modi debunks Pakistan’s claims by visiting Adampur Airbase)
पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून खोटे दावे करण्यात येत होते की, त्यांच्या हल्ल्यामुळे आदमपूर एअरबेस पूर्णपणे नष्ट झाली असून, S-400 एअर डिफेन्स सिस्टम व रडार यंत्रणाही उध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष एअरबेसला भेट देऊन या सर्व दाव्यांना खोटे ठरवले.
पंतप्रधान मोदींनी भेट दिल्यानंतर काही तासांतच त्यांनी सोशल मीडियावर आदमपूर एअरबेसवरील अनेक फोटो शेअर केले, ज्यात S-400 एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे सुरक्षित आणि ऑपरेशनल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तानने जे सॅटेलाईट फोटो मॉर्फ करून पसरवले होते, त्याचा खोटेपणा यामुळे उघड झाला आहे. दौऱ्यादरम्यान मोदींनी विमानतळावरील हवाईदलाच्या तळाचे निरीक्षण केले, जवानांशी संवाद साधला आणि संरक्षण सज्जतेचा आढावा घेतला.
या भेटीत पंतप्रधान मोदींनी जवानांचे खांदे थोपटत त्यांचे मनोबल वाढवले. त्यांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” चा घोष देत सर्व जवानांमध्ये ऊर्जा संचारली. एका फोटोत त्यांच्या मागे “क्यों दुश्मन पायलट ठीक से सो नहीं पाते?” असे वाक्य झळकत होते, ज्याचा स्पष्ट संदेश पाकिस्तानला गेला आहे.
या भेटीमुळे पाकिस्तानच्या सर्व खोट्या दाव्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्का बसला आहे. पाकिस्तानने आधी दावा केला होता की अदंपूरचा रनवे नष्ट केला, S-400 प्रणाली उद्ध्वस्त केली, रडार बेस उडवले, आणि 60 भारतीय जवान ठार झाले. मात्र, प्रत्यक्ष पाहणी आणि फोटोद्वारे हे सर्व दावे फोल ठरले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याने पाकिस्तानच्या फसव्या प्रचाराचा पूर्ण भांडाफोड झाला आहे.
पंतप्रधान मोदींनी X (माजी ट्विटर) वर लिहिले:
“आज सकाळी मी आदमपूर एअरबेसला भेट दिली आणि आपल्या शूर वायू योद्ध्यांशी संवाद साधला. त्यांचं धैर्य, समर्पण आणि निडर वृत्ती पाहून अभिमान वाटला. देशासाठी सर्वस्व झोकून देणाऱ्या या वीरांचा भारत सदैव कृतज्ञ आहे.”
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे केवळ भारतीय जनतेलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हे स्पष्ट झाले आहे की भारताच्या हवाई सामर्थ्यावर कुठलाही हल्ला झाला नाही आणि भारत सज्ज व सक्षम आहे.