विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून कुंडमळा दुर्घटनेची माहिती घेतली. या मदतकार्यात राज्य सरकारला लागेल ती मदत देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ( Prime MinisterUnion Home Minister call Chief Minister Devendra Fadnavis to inquire about Kundamala tragedy)
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावर अनेक पर्यटक उभे असताना हा पूल तुटला. यामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कुंडमळा हे इंद्रायणी नदीवरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दर रविवारी तसेच सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हा पूल कमकुवत झाल्याची तक्रारही येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. हा पूल रविवार दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास कोसळला. आणि यावेळी पुलावर असलेले 20 ते 25 जण पाण्यात बुडाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या घटनेची माहिती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. घटनेची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. आणि केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्यानंतर शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेने खूप दुःख झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आणि सध्याच्या परिस्थितीची विचारपूस केली. जवळच तैनात असलेल्या एनडीआरएफ पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, आणि तत्परतेने अनेकांचे जीव वाचवले. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांप्रति मनापासून संवेदना. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी अमित शहांनी प्रार्थना केली आहे.