विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अत्यंत कमी दरात जमिनी विकत घेऊन काही वर्षांनी त्या उच्च दराने विकून कोट्यवधींचा नफा मिळवत भूखंडांचे श्रीखंड खाणारे प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.२००८ साली झालेल्या हरियाणामधील वादग्रस्त जमीन व्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशीसाठी बोलावण्यात आले. ( Priyanka Gandhis husband Robert Vadra questioned by ED for taking a huge chunk of land)
हे प्रकरण मनी लॉन्डरिंगशी संबंधित असून त्यामध्ये अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. ईडीने आधीच काही महत्त्वाच्या दस्तऐवजांवर तपास सुरू केला असून, वड्रा यांची चौकशी ही तपासाच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरणार आहे.
हा जमीन व्यवहार हरियाणाच्या फरीदाबादजवळील अमीपुरा परिसरातील आहे. २००८ मध्ये काही कंपन्यांमार्फत भूखंड विकत घेण्यात आले होते. तपासानुसार, वड्रा यांच्या मालकीच्या किंवा संबंधीत असलेल्या कंपन्यांनी अत्यंत कमी दरात जमिनी विकत घेतल्या. काही वर्षांनी त्या उच्च दराने विकून कोट्यवधींचा नफा मिळवला. हा व्यवहार संदिग्ध असल्यामुळे त्यावर ‘बेनामी मालमत्ता’, ‘मनी लॉन्डरिंग’ व ‘आर्थिक फसवणूक’ अशा विविध कलमांतर्गत चौकशी सुरू आहे.
याआधीही रॉबर्ट वड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाने काही वेळा चौकशी केली होती, विशेषतः लंडनमधील एका प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणात. मात्र, हरियाणा जमीन प्रकरणात त्यांची ही पहिली मोठी चौकशी मानली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडे प्राप्त झालेल्या दस्तऐवजांमध्ये काही नावे, आर्थिक व्यवहार आणि संदिग्ध ट्रान्सफर यांचा उल्लेख आहे, जे वड्रा यांच्या कंपन्यांशी संबंधित असल्याचा संशय आहे.
या संपूर्ण प्रकारावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते म्हणाले, “हे राजकीय हेतूंनी प्रेरित पावले आहेत. मोदी सरकार विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे.” प्रियांका गांधी यांनीदेखील यापूर्वी सार्वजनिकरित्या आपल्या पतीवरच्या आरोपांना खोडून काढले असून, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.
ईडीच्या चौकशीत वड्रा यांनी आज सहकार्य केले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. या प्रकरणात पुढे अटकही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईडी यानंतर संबंधित कंपन्यांच्या आर्थिक नोंदी, व्यवहार, आणि त्यांच्याशी संबंधित अन्य व्यक्तींनाही चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे.