मुंबई : वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाच्या घटनेबाबत तातडीने चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना केली आहे.
( Professor’s offensive behavior towards student during exam, Dr. Neelam Gorhe orders to take strict action)
या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाचा तातडीने आणि निष्पक्षपणे तपास होण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच आरोपीला कोणतेही पाठबळ मिळणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केले असल्यास त्याचा तपास करून पुरावे गोळा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
विद्यार्थिनींवरील कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात कठोर पावले उचलली जातील आणि दोषींना कडक शिक्षा होईल, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.