विशेष प्रतिनिधी
पुणे : वडगाव शेरी येथील आनंदपार्क परिसरात ‘स्पा’च्या आड वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली असून, ‘स्पा’च्या मॅनेजरसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Prostitution business operating under the name of spa exposed in Vadgaon Sheri)
या प्रकरणी पोलीस शिपाई वर्षा नामदेव सावंत यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार स्पा मॅनेजर रिया रंजीत शर्मा (२१, रा. चंदननगर), स्पा मालक संदीप त्रिपाठी (रा. वडगाव शेरी), आणि राहुल जाधव (रा. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सृष्टी स्पा’ नावाचा हा व्यवसाय शैलेश पार्क इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुरु होता. या स्पाचा मालक संदीप त्रिपाठी व राहुल जाधव हे असून, रिया शर्मा हिच्यामार्फत वेश्या व्यवसाय राबवला जात होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २८ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान, दोन महिलांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले होते. आरोपींनी या महिलांकडून व्यवसाय करून घेतला व त्यातून पैसा मिळवला, असा आरोप आहे.
या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.