विशेष प्रतिनिधी
पुणे : धानोरी येथील पोरवाल रोड परिसरातील स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणाहून पाच पीडित मुलींची सुटका केली आहे. पीडितांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ( Prostitution by minor girls in spa center five victims rescued)
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सोमवारी (दि. ७) दुपारी ही कारवाई केली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात स्पा मॅनेजर महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. किरण बाबुराव आडे उर्फ अनुराधा बाबुराव आडे (वय २८, रा. खराडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात महिला पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरवाल रोड, धानोरी परिसरातील आयजी धाम इमारतीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे, पथकाने बनावट ग्राहक पाठवून लक्स स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. त्यावेळी तिथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार, पथकाने पंचांना सोबत घेऊन छापा टाकला. या छाप्यात पाच तरुणी आढळून आल्या. पथकाने त्यांची सुटका केली. या पाच मुलींमध्ये दोन अल्पवयीन मुली असल्याचे पुढे आले.
आरोपी स्पा मॅनेजर किरण बाबुराव आडे उर्फ अनुराधा बाबुराव आडे ही पीडित तरुणींना जादा पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होती. ती स्पा सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होती असे समोर आले आहे. दरम्यान, सर्व मुलींना सुरक्षितपणे सोडवून बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का आणि तिला ग्राहक कोण पुरवत होते, हे शोधण्यासाठी विमानतळ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांना स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी पाच पीडित तरुणी तेथे आढळून आल्या, त्यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्पा मॅनेजर महिलेला अटक करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे, यांनी सांगितले.