विशेष प्रतिनिधी
पुणे : कोथरूड येथील उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) यांचा बिहारमधील पटणा येथे खून करण्यात आला आहे. सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात अडकवून त्यांना पाटण्याला बोलावून घेण्यात आले आणि तेथे त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला.
( Pune businessman murdered in Patna due to cyber fraud)
शिंदे हे आपल्या कंपनीच्या कामासाठी इंटरनेटवरून काही औद्योगिक टूल्स आणि मशीनरी स्वस्तात विकत घेण्याच्या शोधात होते. आरोपींकडून त्यांना एका ईमेलच्या माध्यमातून स्वस्त दरात मशिनरी विक्रीसाठी आमिष दाखवण्यात आले. त्या प्रस्तावावर विश्वास ठेवून शिंदे हे स्वतः बिहारला गेले. मात्र, हा सर्व प्रकार एक सायबर फसवणूक असल्याचे उघड झाले.
शिंदे बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काल पाटण्यात त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पटणा पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. व्यवसायिकांनी अशा ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.