विशेष प्रतिनिधी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. मात्र त्यांच्या विधानात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे सांगत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हा दाखल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
( There is no crime against Rahul Solapurkar, Pune Police Commissioner clarified)
अमितेश कुमार म्हणाले, राहुल सोलापूरकर यांनी विधान केलेल्या दोन्ही व्हिडिओ क्लिप पोलिसांनी तपासल्या आहेत. त्याcमध्ये गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही.राहुल सोलापूरकर यांनी आमच्याकडे सविस्तर खुलासा पाठवला असून त्याचे अवलोकन करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याहीपुढे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची स्थिती नाही.
,या प्रकरणी कोणी काय म्हणतंय यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, तर सध्या तरी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ दहा दिवसांपूर्वीसमोर आला होता. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्या विधानाच्या निषेधार्थ राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर राज्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या. त्या पार्श्वभूमीवर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या सर्व घडामोडी दरम्यान काल आरपीआय आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथून सुटकेवर एका पॉडकास्टमध्ये बोलताना सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली असे ते म्हणाले होते. यामुळे शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलताना वेदानुसार ते ब्राह्मणच आहेत असे विधान सोलापूरकर यांनी केले होते.