विशेष प्रतिनिधी
पुणे : सामान्य माणसाला हाडतूड करणाऱ्या पुणे पोलिसांना बिल्डरांच्या पोरांचा मात्र चांगला लळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. ,अश्लील कांड प्रकरणातील आरोपीलाही बर्गर, कोल्ड कॉफी पुरवण्याचा प्रयत्न पोलीस चौकीत झाला. ( Pune police pamper builders’ sons, even tried to provide burgers and cold coffee to the accused in the obscenity case)
शनिवारी सकाळी पुण्यात एका तरुणाने भररस्त्यात बीएमडब्ल्यू कार थांबवत लघुशंका केल्याची घटना समोर आली होती. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला पाहून आरोपीनं आपलं गुप्तांग दाखवलं. या विकृत घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी गौरव अहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला अटक केली आहे. पण आता आरोपींचं पोलीस ठाण्यात लाड पुरवले जात असल्याचे समोर आले आहे. भाग्येश ओसवाल याच्यासाठी त्याच्या मित्राने पोलीस ठाण्यात आणलेले बर्गर, कोल्ड कॉफी आणि कोल्ड्रींक्स पुरविण्याचा प्रयत्न केला.
. पुण्यात पोर्श अपघात प्रकरण घडलं होतं. एका १७ वर्षीय बिल्डरच्या मुलाने दारुच्या नशेत आलिशान कार चालवत दोन आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीला उडवलं होतं. या अपघातानंतर आरोपीला जेव्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तेव्हा आरोपी तरुण बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने त्याच्यासाठी बर्गर आणि पिझ्झा देण्यात आल्याचा आरोप झाला होता. आता या नवीन प्रकरणात देखील असाच प्रकार घडला आहे.
पुणे अश्लील कांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी गौरव अहुजाच्या आधी त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला अटक केली होती. रात्री उशिरा त्याला पर्णकुटी पोलीस ठाण्यात आणलं होतं. यावेळी आरोपी ओसवाल याला त्याच्या मित्राने बर्गर, कोल्ड कॉफी आणि कोल्ड्रींक्स पुरवण्याचा प्रयत्न केला. तो एका पांढऱ्या रंगाच्या बॉक्समध्ये हे खाद्य पदार्थ घेऊन पोलीस ठाण्याजवळ आला होता. मात्र तिथे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी गराडा घातला होता. त्यामुळे त्याला हे खाद्य पदार्थ देता आले नाही.