विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सध्या चारही धरणांमध्ये एकूण १६.७८ टीएमसी पाणीसाठा साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला या धरणांमध्ये फक्त ४.७२ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मान्सूनच्या आगमनानंतर सततच्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.
( Pune residents water worries resolved all four dams now have 16.78 TMC of water)
घाट परिसरात बुधवारी सायंकाळी ते गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणांमध्ये १ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा संपूर्ण वर्षभर शहराला पाणीपुरवठा करण्यास पुरेसा आहे. यामुळे पुणेकरांची पाण्याच्या चिंतेपासून मुक्तता मिळाली आहे.
खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांचा समावेश आहे. या चारही धरणांची एकूण साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. पुणे शहराला दरमहा १.२५ (चौथा) टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पुणेकरांची ही पाण्याची गरज खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाण्याने भागवली जाते. यावर्षी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे भरली आहेत.
सध्या खडकवासला धरणात १.२८ टीएमसी (६४.७५%),
पानशेतमध्ये ५.९२ टीएमसी (५५.५५%),
वरसगावमध्ये ७.९० टीएमसी (६१.६३ टीएमसी)
आणि टेमघर धरणात १.६९ टीएमसी (४५.५०%) पाणीसाठा आहे.
या चारही धरणांमध्ये एकूण १६.७८ टीएमसी (५७.५७%) टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला या धरणांमध्ये फक्त ४.७२ टीएमसी (१६.१९%) पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुसळधार पावसामुळे धरणांचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.
गेल्या वर्षी खडकवासला धरणातून अचानक पाणी नदीत सोडण्यात आल्यामुळे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या घटनेनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळ्याच्या शेवटच्या काही दिवसांपर्यंत खडकवासला धरण अर्ध्यावर ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने खडकवासला धरणात फक्त ५० टक्के पाणी साठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, धरणाची पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने या वर्षी आतापर्यंत खडकवासला धरणातून ३.१९ टीएमसी पाणी नदीत सोडले आहे.