विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर धाराशिव जिल्ह्यातील एका गावच्या जत्रेत हल्ला झाला. एका पैलवानाने त्याच्यावर हल्ला केला. तो आणि आयोजक हे आखाड्यात पैलवानांची भेट घेत होते. ( Punes notorious gangster Nilesh Ghaywal attacked by wrestler at village Jatra)
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात निलेश घायवळ हा जत्रेनिमित्त आला होता. येथील ग्राम दैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता. याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी राज्यभरातून मल्ल उपस्थितीत होते. या जत्रेत भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात पैलवानांना भेटण्यासाठी गेला असता, अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती.
निलेश घायवळ याच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.
घायवळ याच्यावर यापूर्वी मोक्का, खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.