विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : घाणेरडे राजकारण सोडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार जी काही पावले उचलते आहे त्याला पाठिंबा द्या अन्यथा बसप रस्त्यावर उतरेल असा इशारा बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला दिला आहे.
( Quit dirty politics support Modi government otherwiseMayawatis warning to Congress Samajwadi Party)
बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी एक्स या सोशल मीडिया हॅण्डलवरुन एक पोस्ट केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा द्यावा, असे ठामपणे सांगताना मायावती म्हणाल्या आहेत की , पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार जे काही पावले उचलते आहे, त्या प्रत्येक गोष्टीला सर्व पक्षांनी एकत्र येऊन समर्थन द्यायला हवे. या संधीचा उपयोग करून पोस्टर लावणे, वक्तव्य करून घाणेरडं राजकारण करणं अयोग्य आहे. अशा वर्तनामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो, आणि तो देशाच्या हिताचा नाही.”
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होऊ नये, याकडेही लक्ष वेधत या संदर्भात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने विशेष दक्षता घ्यावी, अन्यथा बसप रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही मायावती यांनी दिला आहे.
मायावती यांच्या विधानाचा संदर्भ काँग्रेस पक्षाच्या अलीकडील हालचालींशी जोडला जात आहे. काँग्रेसने आपल्या नेत्यांना पहलगाम हल्ल्याबाबत पक्षशिस्त पाळण्याचे आदेश दिले होते. कोणत्याही बेलगाम वक्तव्यांबाबत कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले होते.