विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील नामांकित शिक्षणसंस्था संस्थापकांचा नातवाचे रॅगिंग केल्याप्रकरणी बी. जे. मेडिकल कॉलेजमधील ऑर्थोपेडिक्स विभागातील तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांची विभागप्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना उपअधिष्ठातापदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. (Raging by grandson of founder of renowned educational institution three senior resident doctors dismissed)
ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची माहिती उजेडात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक घेतली. तक्रारदार निवासी डॉक्टरच्या माहितीवरून प्राथमिकदृष्ट्या रॅगिंग करणारे निवासी डॉक्टर दोषी असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.रॅगिंग प्रकरणी तीन निवासी डॉक्टरांना निलंबित केले असून, वसतिगृहातूनही हकालपट्टी केली आहे. अंतिम अहवाल काही दिवसांत दिला जाईल. डॉ. गिरीश बारटक्के यांच्याकडून विभागप्रमुख पदाचा कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत काढून घेतला आहे, असे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले.
डॉ. बारटक्के यांचे विभागप्रमुखपद काढून ते डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांना देण्यात आले आहे, तसेच डॉ. बारटक्के हे कॉलेजचे उपअधिष्ठाता होते, त्यांना त्या पदावरून हटवून सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. अँटी रॅगिंग समिती सात दिवसांच्या आत अहवाल शासनाला सादर करणार आहे.
बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले की, एका विद्यार्थ्याच्या आईने ही तक्रार केली असून, गेल्या ८ ते १० दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पण ओरडणे, शिवीगाळ करणे म्हणजे रॅगिंग नव्हे! संपूर्ण प्रकरणाची दखल आम्ही तत्काळ घेतली आहे. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी १५ ते २० डॉक्टरांची अँटी रॅगिंग समिती स्थापन करण्यात आली आहे.