विशेष प्रतिनिधी
पुणे :ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ऑर्थोपेडिक्स विभागातील एमएसच्या पहिल्या वर्षातील एका निवासी डॉक्टरने वरिष्ठ दोन विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगची तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रॅगिंग झालेला निवासी डॉक्टर पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थापकाचा नातू आहे.
( Raging of grandson of founder of renowned educational institution at B. J. Medical College action taken after intervention of ministry)
तक्रारीनुसार, संबंधित विद्यार्थी अनेक दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत होता. त्याला कधी डोक्यावरून गरम पाणी ओतायला लावले जात होते, तर कधी थंड पाणी. हा प्रकार विभागप्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांच्याकडे सांगण्यात आला होता, मात्र त्यांनी योग्य ती दखल घेतली नाही, असा आरोप आहे. त्यानंतर ही तक्रार ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्याकडेही करण्यात आली. पण तिथूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी थेट मंत्रालयात तक्रार केली.
मंत्रालयात तक्रार गेल्यानंतर कॉलेज प्रशासन खडबडून जागे झाले आणि अँटी रॅगिंग समितीची तातडीने बैठक घेण्यात आली. समितीने संबंधित विद्यार्थ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आणि प्राथमिक चौकशीनंतर दोषी आढळलेल्या दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी म्हणजेच एका टर्मसाठी निलंबित करण्यात आले आहे.
रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणावर माध्यमांसमोर मौन बाळगले आहे. डॉ. एकनाथ पवार यांचीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. रॅगिंगचा हा प्रकार पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थापकाच्या नातवावर झाला असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे प्रकरण आणखी गाजण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून माहिती बाहेर जाऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात असली तरी, थेट मंत्रालयाच्या पातळीवर तक्रार झाल्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे. चौकशी समितीचा अंतिम अहवाल लवकरच सादर होण्याची शक्यता आहे.