विशेष प्रतिनिधी
पुणे : खळबळजनक वक्तव्य करून राजकारण करण्याचा नवीन प्रकार राहुल गांधी यांनी सुरू केला आहे. आरोप करण्यासाठी फार काही अक्कल लागत नाही. राहुल गांधी हे पार्टटाइम राजकारणी आहेत, असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मारला आहे. (Rahul Gandhi is a part-time politicianit doesnt take much common sense to make accusationssays Praveen Darekar)
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, राहुल गांधी यांना अलीकडच्या काळात देशाच्या राजकारणामध्ये सिरियसली घेतलं जात नाही. कारण ते सिरियसली राजकारण न करता पार्ट टाइम राजकारण करतात. कारण ते परदेशात जातात आणि कधीतरी दोन दिवस आपल्या देशामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करतात.
प्रवीण दरेकर म्हणाले की, खळबळजनक वक्तव्य करून राजकारण करण्याचा नवीन प्रकार राहुल गांधी यांनी सुरू केला आहे. असे असले तरी आपल्या देशामध्ये निवडणूक आयोग नावाची यंत्रणा आहे. निवडणुकीबाबत काही शंका असतील तर त्या आपण निवडणूक आयोगाला विचारतो. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना तपशीलवार उत्तर देखील दिले आहे. मात्र तरीदेखील संशय निर्माण करून देवेंद्र फडणवीस ज्या गतीने महाराष्ट्राला पुढे नेत आहेत, त्यांना ब्रेक लावण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व सुरू आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही गेल्या काही काळापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लावून धरला आहे. आजही राहुल गांधी यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत 8 टक्क्यांनी मतदार वाढल्याचा दावा केला आहे.
राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी “झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…,” असे म्हणत मोठी पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवाबद्दल तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत चालले आहे, हे मान्य. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? तुमच्या माहितीसाठी सांगतो की, महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत की, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 8 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि त्यापैकी अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे. माझ्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात सात टक्के मतदार (27,065) वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी तेथे निवडणूक जिंकली. उत्तर नागपूरमध्ये सात टक्के (29,348) मतदार वाढले आणि काँग्रेसचे नितीन राऊत यांनी विजय मिळवला. पुणे जिल्ह्यात वडगाव शेरीमध्ये 10 टक्के (50,911) मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे जिंकले. मालाड पश्चिममध्ये 11 टक्के (38,625) मतदार वाढले आणि तुमच्या काँग्रेसचेच अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रामध्ये 9 टक्के (46,041) मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी विजय मिळवला, याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे.