विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणूक आयोग मते चोरत आहे. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. जेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोग वाचणार नाही, अशी थेट धमकीच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. सततच्या धमक्या असूनही, आम्ही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करत असल्याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले आहे.
( Rahul Gandhi threatens to use nuclear bomb against Election Commission)
शुक्रवारी संसदेबाहेर पडताना राहुल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगात मते चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, जो देशद्रोह आहे. तुम्ही कुठेही असाल, जरी तुम्ही निवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू.
यापूर्वी २४ जुलै रोजी राहुल म्हणाले होते की, मी निवडणूक आयोगाला एक संदेश देऊ इच्छितो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सुटाल, जर तुमच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल की ते सुटतील, तर हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही.
राहुल म्हणाले की, मी हे हलक्यात बोलत नाहीये, तर शंभर टक्के पुराव्यांसह बोलत आहे. आम्ही ते प्रसिद्ध करताच, संपूर्ण देशाला कळेल की निवडणूक आयोग भाजपसाठी मते चोरण्याचे काम करत आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत आम्हाला शंका होत्या, महाराष्ट्र निवडणुकीत आमच्या शंका आणखी वाढल्या.
कर्नाटकातील एका जागेवर निवडणूक आयोगाने घोटाळा केला. आमच्याकडे याचे १००% पुरावे आहेत. त्याच मतदारसंघात ५०, ६० आणि ६५ वर्षे वयोगटातील हजारो नवीन मतदारांना यादीत समाविष्ट करण्यात आले आहे आणि १८ वर्षांवरील मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
एका जागेची चौकशी करताना आम्हाला ही अनियमितता आढळली. मला खात्री आहे की प्रत्येक जागेवर तेच नाटक सुरू आहे. मी निवडणूक आयोगाला एक संदेश देऊ इच्छितो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सुटाल, तर तो तुमचा गैरसमज आहे, अशी धमकी त्यांनी दिली.
निवडणूक आयोगाने यावर उत्तर देताना म्हटले आहे की, निवडणूक आयोग अशा निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करतो. सततच्या धमक्या असूनही, आम्ही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्यास सांगू इच्छितो. बेजबाबदार विधानांकडे दुर्लक्ष करा.