विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाहेरून येणारे लोंढे आपल्या शहरांवर आदळत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे. रेल्वेचा व ट्रॅफिक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घडलेल्या रेल्वे दुर्घटनेसाठी परप्रांतीयांना जबाबदार धरले आहे. ( Raj Thackeray blames migrants for train accident says system is completely overwhelmed as trains are hitting)
मुंबईत आज सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणाऱ्या लोकलमधून ८ प्रवासी पडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. या घटनेवर संताप व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, आपल्या देशात माणसाची किंमत नाही. मुंबईतील गर्दी नवी नाही, रेल्वेमंत्री काय करतात. रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता? रेल्वेमंत्र्यांना तिथं जाऊन परिस्थिती बघू द्या.
आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, रस्ते नसल्याने पार्किंग नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्राफिक अडलं जाते. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या अनेक ठिकाणी ही समस्या आहे. जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब आत जाऊ शकत नाही. अशी आपल्या शहराची अवस्था झाली आहे. आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही. आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे आहेत. यामुळेच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, कोण जातंय तुम्हाला माहिती नाही. फक्त मेट्रो आणि बाकीच्या ज्या काही सोयी-सुविधा करत आहेत याने प्रश्न सुटणार नाही. मुंबईत मेट्रो, मोनो सर्व आहे. पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? टू व्हीलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबलंय का, त्या गाड्या येतात आहेत. नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनो कोण वापरतंय, कोणी पाहायला तयार नाही.