विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या अपेक्षा होत्या. प्रामुख्याने माध्यमांनी अनेक पतंग उडवले होते. दोन्ही ठाकरे बंधूंमधील मनोमिलनाचे संकेतही वारंवार दिले जात होते. मात्र, संभाव्य युतीला प्रत्यक्षात येण्यापूर्वीच मोठा सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, आज (१२ जून) सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेली ‘गुप्त भेट’ चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. ( Raj Thackeray – Devendra Fadnavis secret meeting shakes Uddhav-Raj alliance Meeting at Taj Lands Hotel sparks discussions in political circles)
सकाळी साडेदहाच्या सुमारास राज ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचले. अवघ्या २० मिनिटांतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या आजच्या अधिकृत दौऱ्यात या हॉटेलचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे ही भेट पूर्वनियोजित होती का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही भेट साधी सौजन्यभेट होती की आगामी निवडणुकांतील राजकीय समीकरणं बदलण्याचा संकेत, यावर राजकीय विश्लेषक विचारमंथन करू लागले आहेत.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युती ही शिवसेनेच्या मूळ विचारसरणीचा पुन्हा एकदा जागर ठरेल, अशी भावना शिवसेना (उबाठा) व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही पक्ष एकत्र आल्यास मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागात भाजप-शिंदे गटाला जोरदार टक्कर देता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता.
मात्र, गेल्या दशकभरात राजकीय डावपेचांमध्ये तरबेज ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी या संभाव्य युतीचे गांभीर्य ओळखून वेळेत हस्तक्षेप केला का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांना भेटून त्यांची बाजू आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः मनसेने काही दिवसांपूर्वी मोदी-शाह यांचे समर्थन दर्शवणारे अनेक संकेत दिले होते. त्यामुळे मनसे भाजपाच्या जवळ जात असल्याचे स्पष्ट होत होते.
या गुप्त भेटीनंतर, ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीचे स्वप्न अपूर्णच राहणार का? की ही फक्त रणनीतीचा भाग आहे? या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होतील. मात्र, आजच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट तयार झाला आहे, हे निश्चित.