विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण तुरुंगात असताना कुटुंबाला दिलासा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक फोन तरी करायला हवा होता, अशी खंत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
( Raj Thackeray should have made at least one phone callSanjay Raut expressed regret)
राऊत यांच्या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने संवाद साधताना त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी काही गोष्टी विचारण्यात आल्या. राऊत म्हणाले की, मी तुरूंगात होतो, तेव्हा राज ठाकरेंनी एकदा फोन करायला हवा होता. राज ठाकरे माझे मित्र होते. आमचे चांगले संबंध होते. राजकारण वेगळे असले तरी अशावेळी घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा फोन जरी गेला तरी एक आधार वाटतो, की आपल्यासोबत कोणी तरी आहे. ज्या पद्धतीने आमच्यावर संकटाचा डोंगर कोसळला होता, व्यक्तीश: नाही, कुटुंबावर. तेव्हा एक काडीचा आधार असतो. कोणीतरी फुंकर मारणे महत्त्वाची असते, तेव्हा राज ठाकरे यांनी एक फोन तरी करायला हवा होता.
मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील युतीबाबतची चर्चा थांबली आहे का? यावर राऊत म्हणाले की,तुम्हाला काहीच माहित नाही काय घडत आहे ते? तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरून बातम्या करत आहात. पण पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाणार आहे. या सगळ्याचे बाळंतपण होऊ द्या. पण सध्या सगळं व्यवस्थित सुरू आहे. आम्ही सकारात्मक आहोत.