- मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून राजुल पटेल यांनीउमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर आज त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ऐन महापालिकेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
मी गेल्यावेळी अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली होती, तेव्हा मला अपक्ष म्हणून ३२ हजार मते मिळाली होती. त्यामुळे मला यावेळी अपेक्षा होती की, जर मला पक्षाने संधी दिली असती तर मी २५ हजार मतांनी निवडून आले असते. मात्र, पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे हे शक्य झालं नाही”, असं राजुल पटेल या म्हणाल्या.
विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठं अपयश आलं. त्यानंतर ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. एवढंच नाही तर ठाकरे गट महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी संकेत देखील दिले. मात्र, असं असतानाच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
मी गेली ४० वर्ष पक्षात काम केलं. या काळात पक्षाने मला न्याय देखील दिला. मात्र, पक्षात असे काही कार्यकर्ते असतात की त्यांना आपल्यापासून अडचणी असतात. मात्र, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज मी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या काळात अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात काम करण्यासाठी मला संधी मिळेल. तसेच वर्सोवा विधानसभेत आम्हाला विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत मिळेल”, असं राजुल पटेल म्हणाल्या.
“मी जेव्हा ठाकरे गटात होते. तेव्हाही मी कोणत्या पदाची अपेक्षा केली नव्हती. मी माझ्या कामाच्या जोरावर त्या पक्षात उपनेता, नगरसेविका होते. आता या पक्षातही माझ्यावर पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मला मान्य असेल”, असं राजुल पटेल यांनी स्पष्ट केलं.