विशेष प्रतिनिधी
सांगली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयीचे प्रेम पुन्हा उफाळून आले आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना महायुतीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास मात्र विरोध केला आहे. ( Ramdas Athawales invitation to Sharad Pawaropposition to Raj Thackeray)
अजूनही वेळ गेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावे. जर ते आधीच महायुतीत सामील झाले असते, तर आज ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, असे निमंत्रण आठवले यांनी दिले आहे. त्याच वेळी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास आमचा विरोध आधीही होता आणि आजही आहे. लोकसभेला भाजपने त्यांना सोबत घेतले होते, पण त्याचा एनडीएला काहीही फायदा झाला नाही, असे त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. .
आठवले म्हणाले की, शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी नेते आहेत. देशाच्या राजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या पक्षातील बहुतांश आमदार सत्तेत येण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे त्यांनी देखील मोदींसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा. जर त्यांनी वेळेत असा निर्णय घेतला असता, तर आज ते राष्ट्रपतीपदी विराजमान झाले असते.
देशाच्या हितासाठी आणि विकासाच्या दृष्टीने शरद पवार यांनी आता तरी निर्णय घ्यावा. मोदी यांच्यासोबत आले, तर त्यांच्या अनुभवाचा उपयोग देशासाठी होईल. आमच्यासह त्यांच्या पक्षातील अनेकांचेही हेच मत आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास आमचा विरोध आधीही होता आणि आजही आहे. लोकसभेला भाजपने त्यांना सोबत घेतले होते, पण त्याचा एनडीएला काहीही फायदा झाला नाही. माझा पक्ष हा गरीब, वंचितांचा पक्ष आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला योग्य वाटा मिळायला हवा. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे. जर आम्हाला जागा मिळाल्या नाहीत, तर आम्ही ताकदीनं लढू. स्वबळावर लढण्याचाही पर्याय खुले ठेवला आहे, असा इशारा दिला आहे.