विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला राम राम केला आहे. शिवसेनेत (शिंदे गट ) प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काहीही मागितले नसल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस सोडताना दुःख होतेय असेही ते म्हणाले. ( Ravindra Dhangekar finally leaves Congress, joins Shiv Sena Shinde faction)
शिवसेना नेते, उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी धंगेकर यांना पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार ‘मी लपून जाणार नाही.he कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल,’ असे धंगेकर यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
धंगेकर यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक विजयाची नोंद केली होती. त्यांनी कसब्याचे विद्यामान आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, भाजपचे उमेदवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना पराभूत केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही धंगेकर यांना हेमंत रासने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर ते काँग्रेस सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी समाजमाध्यमातून सूचक छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यामुळे या चर्चेला जोर मिळाला. स्वत: सामंत यांनी धंगेकर यांना पक्षात येण्यासंदर्भात प्रस्ताव दिल्याचे जाहीर केल्याने धंगेकर यांचा पक्ष प्रवेशाची केवळ औपचारिकताच राहिली होती.