विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. या पार्शवभूमीवर मनसेबाबत थेट उत्तर देणे टाळत महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही एकत्र येण्यास तयार आहे, असे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
( Ready to unite with anyone to protect the interests of Marathi peopleAditya Thackeray avoids alliance with MNS)
आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम करण्यास तयार असलेल्या कोणत्याही पक्षासोबत, आम्ही काम करण्यास तयार आहोत, हे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत. बदल घडवून आणण्याची आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाने एकत्र येऊन लढले पाहिजे. सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असून ते मुंबईसह राज्याला गिळून टाकतील.
युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्याआधी ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. परंतु, राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र येण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.