लातूर
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 107 सुरक्षा रक्षकांना अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करत भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी तात्काळ या सुरक्षा रक्षकांना कामावर पुनर्नियुक्त करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ( Reinstate 107 Security Guards at Vilasrao Deshmukh Government Medical College, Latur Immediately – Warning from Bhim Army )
2013 पासून हे सुरक्षा रक्षक रुग्णालयात सेवा बजावत होते. कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक जेव्हा रुग्णांच्या संपर्कात यायला घाबरत होते, तेव्हा हेच सुरक्षा रक्षक पुढे सरसावले. इतकंच नव्हे तर, मृत रुग्णांचे शव उचलण्याचेही धाडसी काम या रक्षकांनी केले.
मात्र, 31 जुलै रोजी रुग्णालय प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता, या 107 कर्मचाऱ्यांना ‘उद्यापासून कामावर येऊ नये’ असे आदेश दिले. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, त्यांच्या जागी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या जवानांना 25 ते 30 हजार रुपये मासिक पगार देण्यात येणार असून, मूळ सुरक्षा रक्षक फक्त 9 हजार रुपयांवर सेवा देत होते.
“जे कर्मचारी 12 वर्षे अल्प मोबदल्यावर सेवेत होते, त्यांनी संकटात रुग्णालयाची साथ दिली, त्यांना अचानक बाहेर का काढण्यात आले? जनतेच्या कराचा पैसा अधिक पगार देऊन नवे कर्मचारी आणण्यासाठी वापरणे योग्य नाही. या 107 रक्षकांना पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा कोल्हे यांनी अधीक्षकांना दिला.